लखनऊच्या रस्त्यावरून धावणार स्मार्ट क्लासरूम

भिक्षेकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारची खास सोय
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार उत्तर प्रदेशमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते आता भिक्षेकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी आदित्यनाथ सरकारने खास योजना आणली. असून त्यासाठी लवकरच लखनऊच्या रस्त्यावरून स्मार्ट क्लासरूम धावणार आहेत. म्हणजेच एका मोठ्या बसमध्येच क्लासरूम तयार करण्यात येणार असून भिक्षेकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शिक्षणाची सोय केली जाणार आहे.
भीक मागण्याच्या व्यवसायातून गेल्या काही कालावधीमध्ये ज्यांना मुक्त करण्यात आले आहे अशा लोकांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. सरकारने नुकतीच या योजनेला परवानगी दिली असून लखनऊ महानगरपालिकेला अत्याधुनिक अशा बस खरेदी करण्यासही परवानगी दिली आहे. लखनऊमधील ज्या रस्त्यांवर ही मुले एकेकाळी भीक मागत होती त्याच रस्त्यांवर आता या बस उभ्या राहणार असून त्याच ठिकाणी या मुलांना शिक्षण दिले जाणार आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तयार केलेल्या प्रस्तावाप्रमाणे या बसमध्ये क्लासरूम फळा बेंच या शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध केल्या जाणार आहेत. जे विद्यार्थी सर्वसामान्य शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन या बसच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.
महानगरपालिकांच्या आयुक्त यांच्या या प्रस्तावाला उत्तर प्रदेश राज्याच्या परिवहन महामंडळानेही पाठिंबा दिला असून महानगरपालिकेसाठी काही बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बसचे रूपांतर क्लासरूममध्ये करण्याबाबत आयुक्तांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. लखनऊमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेशात इतर काही शहरांमध्येही अशाच प्रकारचा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.




