फलटण तहसील कार्यालयाचा ढिसाळ कारभार; संगणक चोरीमुळे सामान्यांना बसणार फटका

फलटण (अजय माळवे) – फलटण तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना आगामी काळात फटका बसणार असल्याचे कटू सत्य आहे. शासकीय कार्यालयांमधील कासवगतीचा कारभार लोकांच्या अंगवळणी पडला आहे; परंतु कार्यालयीन कामकाजातील महत्त्वाच्या गोष्टीच गायब झाल्यास “टोलवाटोलवी’ करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती आयते कोलीत मिळते. असाच प्रकार फलटणच्या तहसील कार्यालयात झाला, तर अजिबात नवल वाटू नये.

या कार्यालयातून चोरट्यांनी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबल, इंटरनेटचे राऊटर, अशी महत्त्वाची सामग्री लंपास केल्याने “आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती आहे.

शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी या ना त्या कामासाठी तलाठ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत रोज खेटे घालत असतात. सातबारा, खातेउतारा ही जमिनीशी संबंधित कागदपत्रे देण्याची सुविधा ऑनलाइन झाली आहे; परंतु कार्यालयातील संगणकच चोरीस गेल्याने पुढचे काही दिवस यंत्रणा पूर्ववत होईपर्यंत कार्यालयाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्यांना बसणार का? असा सवाल विचारला जात आहे.

येथील संस्थानकालीन सेंट्रल बिल्डिंग या समोरासमोर असलेल्या दोन आकर्षक इमारतींमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, नीरा उजवा, दोन्ही बांधकाम विभाग, उपनिबंधक, कोषागार अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत. या इमारतींना संरक्षक भिंती व तीन प्रवेशद्वारे आहेत. या कार्यालयातील अनेक जागा सध्या रिक्त असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जादा काम करावे लागत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक, मार्चअखेरीची उद्दिष्टपूर्ती, महसूल वसुली, नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती संकलन, शासकीय मदत वितरण, करोनामुळे वाढलेले काम, यामुळे अनेक कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत, तर काही जण सकाळी लवकर येत आहेत.

त्यांच्या सोयीसाठी कार्यालयाची किल्ली व्हरांड्यात सर्वांना माहीत असलेल्या ठिकाणी ठेवली जात होती. त्याबाबत किंवा कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांची माहिती घेऊन कोणीतरी हा डल्ला मारल्याची चर्चा आहे.

यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयातून आणि सातबारा संगणकीकरण सुरू असताना तहसील कार्यालयाच्या सभागृहातून काही तलाठ्यांचे लॅपटॉप चोरीस गेले होते. आता तहसील कार्यालयातील संगणक यंत्रणाच चोरीस गेली आहे.

त्यामध्ये असलेली कामकाजविषयक माहिती, दाव्यातील कागदपत्रे, शासकीय आदेश, अशा अनेक बाबी नसल्याने प्रशासनाला दैनंदिन कामकाज करणे अशक्‍य होणार आहे.

वास्तविक शासकीय कार्यालयांना कामकाजानंतर कुलपे लावून चाव्या रखवालदाराच्या ताब्यात देणे आणि कर्मचाऱ्यांची येता-जाता नोंद ठेवणे आवश्‍यक होते; पण येथे “आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती असल्याने माहितगारांनी लक्ष ठेवून फायदा घेतला असल्याची चर्चा आहे.

तहसील कार्यालयात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचे काम सोपे झाले. काही जणांनी थेट नायब तहसीलदार व एका कारकुनावर आरोप केले आहेत. आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी अंगलट येऊ नयेत, म्हणून त्यांनी ही चोरी घडवून आणल्याची चर्चा आहे.

याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी करण्याची मागणी काही जणांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.