पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावातील वनसदृश्य 25 व 26/1 अ खासगी भूखंडावर शेकडो झाडांची कत्तल केल्याची माहिती पंचनाम्यावरुन स्पष्ट झाली आहे. महाबळेश्वर वन विभाग व महसूल विभाग यांनी सामाईक केलेल्या पंचनाम्यामध्ये एकूण 177 झाडे तोडली असल्यसाची धक्कादायक माहिती महाबळेश्वर तहसीलदारांना सादर केली आहे. वनसदृश्य जमिनीवर तोडलेल्या या झाडांच्या कत्तलीने आता पुढील कारवाई वन विभाग करणार का, याबाबत महाबळेश्वर तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
मोजे कुभरोशी येथील सर्व्हे नंबर 26/ अ 1 व सर्व्हे नंबर 25 मध्ये बाळासो भोसले व अजय भोसले यांच्या मालकी हिस्स्याच्या क्षेत्रामध्ये विनापरवाना शेकडो झांडाची कत्तल केली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. अंजन, जांभुळ, आईन, पिसा, गिलोरा, करंवदे काटेरी, आंबोळी, केंजळ, टिपन, करड्या, हेळा, हिरडा, भोमा, भुरटी झाडे या प्रकारची एकूण 177 झांडाची कत्तल केली असल्याची गंभीर माहिती पंचनाम्यात आहे.
संवेदनशील पर्यावरणातील प्रतागडाच्या पायथ्याशी झाडांची बेसुमार कत्तल करुन धनदांडगे पर्यावरणाला बाधा निर्माण करत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात राजकीय वरदहस्ताने अनधिकृत बांधकाम व वृक्षतोडीला लगाम उरला नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी धनदांडग्यांनी मनी पॉवर व मसल पॉवरने बेसुमार वृक्षतोडीचा घाट घातला आहे. याबाबत महसूल व वन विभागाच्या सयुक्त पंचनाम्यामुळे आता पुढील कारवाई कोण करणार याबाबत चर्चा सुरु आहे. महाबळेश्वरच्या संवेदनशील पर्यावरणाला वाचवण्याकरीता प्रशासन काय कारवाई करणार याबाबत लक्ष लागून राहिले आहे.
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…
जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा
संवेदनशील पर्यावरण व निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे महाबळेश्वर. त्याचे राजकीय वरदहस्ताने लचके तोडायच काम धनदांडगे वृक्षतोड करुन करत आहेत. संवेदनशील प्रशासकीय अधिकारी म्हणून बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याची जरब बसवावी अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.