Satara News : ओझर्डे धबधब्यावर स्काय-वॉक, नेहरू उद्यानात वृंदावन गार्डन, आणि हेळवाकमध्ये भव्य बोट क्लब उभारणार

कोयनानगर : सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य कोयनानगर परिसरात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.नुकत्याच राज्य शासनाच्या जाहीर झालेल्या अर्थ संकल्पात दोन महत्वाकांक्षी प्रकल्प उभे करायला शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ओझर्डे धबधब्यावर स्काय-वॉक, नेहरू उद्यानात वृंदावन गार्डन, आणि हेळवाक येथे भव्य बोट क्लब उभारण्याच्या बहुउद्देशीय प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर कोयनानगर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरणार आहे.
कोयना धरण हे १९६० च्या दशकात उभारण्यात आले होते आणि तेव्हापासून हा परिसर संरक्षण क्षेत्रात मोडत असल्याने येथे पर्यटन मर्यादित होते. मात्र, १९२३ च्या ‘शासकीय गुप्तता कायद्या’मध्ये आवश्यक बदल शिंदे सरकारने करत, राज्य शासनाने या भागात पर्यटनाला चालना देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. कोयना परिसराचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत, येथील पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
कोयना नदीच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात हेळवाक येथे भव्य बोट क्लब उभारण्यात येणार आहे. जलपर्यटनाचा अनुभव: बोटिंग, जलक्रीडा आणि साहसी उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांना जलसंपत्तीचा आनंद घेता येईल. पर्यावरणपूरक प्रकल्प: प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि निसर्गसंपत्तीचे रक्षण केले जाईल.
स्थानीयांना रोजगार: स्थानिक तरुणांसाठी बोटिंग, गाईडिंग, जलक्रीडा व्यवस्थापन अशा क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.कोयनानगरमधील नेहरू उद्यान हे पर्यटकांचे आवडते विश्रांती स्थळ आहे. आता या उद्यानात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर भव्य बाग उभारण्यात येणार आहे.नयनरम्य फुलांची रचना, प्रकाशझोतात चमकणारे जलप्रपात, रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई, पर्यावरण स्नेही सजावट या बागेच्या माध्यमातून पर्यटकांना अद्वितीय आणि शांतीचा अनुभव घेता येईल.
ओझर्डे धबधबा :
हा कोयनानगरमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथे उभारण्यात येणारा स्काय-वॉक हा पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे.धबधब्याच्या वरून चालण्याचा रोमांचक अनुभव, निसर्गाच्या सौंदर्याचा थेट साक्षात्कार, साहसी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनानगरच्या पर्यटनाला नवे वळण देण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी कोयनानगर परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
स्थानिक हस्तकला, खाद्यपदार्थ, व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन, कोयनानगरचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास हे प्रकल्प केवळ पर्यटनाला चालना देणार नाहीत, तर स्थानिकांना विविध रोजगार संधीही निर्माण करून देणार आहेत. तसेच, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे संपूर्ण परिसराचा आर्थिक विकास होईल.
कोयनानगरचा नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगल, प्रचंड जलसंपत्ती आणि सांस्कृतिक परंपरा यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. हे प्रकल्प या अनुभवात भर घालणार आहेत. कोयनानगरमधील बोट क्लब, स्काय-वॉक, आणि वृंदावन गार्डन हे प्रकल्प कोयनानगरच्या पर्यटनाच्या विकासाला नवी दिशा देणार आहेत. या प्रकल्पांमुळे कोयनानगर लवकरच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल. निसर्गाच्या सान्निध्यात जलक्रीडा, साहस आणि सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर कोयनानगरला नक्की भेट द्या.





