गोदावरीत सहा मुलं बुडाली; मेडीगड्डा धरणाजवळील दुर्घटनेने कुटुंबीयांचा आक्रोश

गडचिरोली : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या मेडीगड्डा धरणाजवळील गोदावरी नदीच्या पात्रात शनिवारी संध्याकाळी आंघोळीसाठी गेलेली सहा मुलं बुडाल्याची दु:खद घटना घडली. सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून वाहणाऱ्या गोदावरी नदीत ही दुर्घटना घडली असून, रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, या मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलीस आणि स्थानिक मच्छीमार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली, परंतु अंधार आणि नदीला आलेल्या वाहत्या पाण्यामुळे शोधकार्याला मर्यादा आल्या. सध्या पावसाळ्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, वाहत्या पाण्यामुळे मुले वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुलांच्या कुटुंबीयांनी नदीकिनारी धाव घेतली असून, त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
तेलंगणा पोलिसांनी रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या मोहिमेतून मुलांबाबत ठोस माहिती मिळण्याची आशा आहे. ही घटना गडचिरोली आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. नदीच्या पाण्याचा वेग आणि खोली यांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे.





