Nashik Rain : नाशिकमध्ये जून महिन्यात विक्रमी पाऊस; गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर

Nashik – यंदाच्या जून महिन्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने गेल्या दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले असून, अवघ्या महिनाभरात तब्बल 439 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला असून, गंगापूरसह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक शहरातील अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि घाट पाण्याखाली गेली आहेत.
सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती सलग सहाव्या दिवशीही कायम आहे.
दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून, रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे, तर अनेक लहान मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे अवघ्या आठ दिवसांत धरणसाठ्यात तब्बल 13 टक्के वाढ झाली आहे. धरणांची सरासरी भरण आता 25% वरून 38% पर्यंत पोहोचली आहे. गंगापूर धरण 65% क्षमतेने भरले असून, यामधून जवळपास 6 हजार क्यूसेकने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
गंगापूरसह दारणा, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. विशेषतः नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 15 हजार क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात असून, गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणालाही लाभ
नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरणालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या वाहणारे पाणी थेट जायकवाडीच्या दिशेने जात असल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.





