जायकवाडी 97.50% भरले ! गोदावरीत 3144 क्युसेकचा विसर्ग सुरू

पैठण – मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा 97.50 टक्के झाला असून सोमवारी दुपारी 1 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी1 च्या सुमारास धरणाच्या गेट क्र. 10, 27, 18,19, 16 व 21 असे एकूण 6 गेट 0.5 फुट उंचीने उघडून 3144 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. हा विसर्ग पाण्याची आवक पाहून कमी – जास्त केला जाईल. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तत्पूर्वी, सोमवारी सकाळी धरण अभियंता प्रशांत जाधव यांनी याबाबद माहिती दिली होती. मागील वर्षी याच दिवसात धरणाचा साठा 32.42 टक्के होता. दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये 100 टक्के भरल्याने, 28 जुलै 2022 रोजी धरणाचे 18 दरवाजे उघडून पाणी सोडले गेले होते.
तर यंदा जायकवाडी धरण 8 ऑगस्टला 97 टक्के भरले होते. यामुळे सोमवारी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली होती. त्यानुसार आता आज धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





