Ashok Kharat : खरात प्रकरणात एसआयटीच्या तपासाला वेग; मंदिराचा पुजारी आणि सुरक्षारक्षकाची कसून चौकशी
खरातवर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि जादूटोण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Ashok Kharat – स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरुद्ध बलात्कार, नरबळी आणि जादूटोण्याचा आरोप असलेल्या प्रकरणात रविवारी एसआयटीने नाशिकमधील ईशानेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि एका सुरक्षारक्षकाची चौकशी केली. या कारवाईमुळे खरातच्या बाबतीतील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. शनिवारी खरातच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव याची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी तपास पथकाने आपला मोर्चा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिराकडे वळवला.
येथील केअरटेकर पुजारी प्रमोद गडाख आणि एका सुरक्षारक्षकाचा चौकशी करण्यात आली . अशोक खरातच्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती वाढत गेली असून, खरातचे राजकीय संबंध आणि सिन्नरमधील जमिनीचे व्यवहार पोलीस खंखाळून पाहत आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी खरातचे मिरगाव येथील फार्महाऊस, टिकडे कॉलनीतील बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातील सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केले आहेत.
खरातवर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि जादूटोण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यावर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंध व उच्चाटन कायद्या’नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खरातने स्वतः देखील दोन व्यक्तींविरुद्ध आपल्याला अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल केल्याची तक्रार वावी पोलीस ठाण्यात दिली आहे.
राजकिय पडसाद..
या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. राज्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी एक मोठा निर्णय घेत, खरातशी संबंधित ‘शिवनिक संस्थान’ या ट्रस्टला दारणा धरणातून दररोज ३९ लाख लिटर पाणी उचलण्याची परवानगी देणारा २०२० मधील शासन निर्णय रद्द केला.
पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेले हे पाणी खरात आपल्या आंब्याच्या बागांसाठी वापरत असल्याचा आरोप आहे. हे पाणी कोणत्या आधारावर मंजूर झाले, याची चौकशी करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले आहेत.






