P. Chidambaram : जयशंकर यांच्याबाबत सीतारामन बनल्या मस्क? चिदंबरम यांचा मिश्कील सवाल

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींत दरवर्षी कपात केली जात आहे, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सोमवारी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याबाबतीत जगातील आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क बनल्या आहेत का, असा मिश्कील सवालही त्यांनी केला.
राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेचा प्रारंभ चिदंबरम यांनी केला. त्यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासाठीचा निधी कमी-कमी होत चालल्याकडे लक्ष वेधले. मागील आर्थिक वर्षात (२०२३-२४) परराष्ट्र मंत्रालयासाठी २८ हजार ९१५ कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला. चालू वर्षासाठी २५ हजार २७७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. आगामी वर्षात परराष्ट्र मंत्रालयाला केवळ २० हजार ५१७ कोटी रूपये उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी मस्कविषयक टिप्पणी केली. त्यामुळे राज्यसभेत हशा पिकला.
दुसऱ्या कार्यकाळासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी विशेष विभाग स्थापन केला आहे. त्या विभागाची धुरा मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचा संदर्भ घेऊन चिदंबरम यांनी संबंधित टिप्पणी केली. परराष्ट्र मंत्रालयासाठीच्या निधीमध्ये कपात करण्याची कारणे समजावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, जगभरातील भारताचे अस्तित्व कमी करायचे आहे का? दूतावास बंद करायचे आहेत का, अशा प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली.





