साहेब ! अंत पाहू नका… दारूबंदीसाठी महिला धडकल्या थेट पोलिस ठाण्यात; कळमनुरी तालुक्यातील महिलांचे पोलिसांना निवेदन

– शिवशंकर निरगुडे (प्रतिनिधी)
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मुंढळ येथे मागच्या महिन्यांपासून मुंढळ व परिसरातील अनेक गावांत दारु विक्रीचे प्रमाण वाढले आहे. नवरा दारु पिऊन घरात धिंगाणा घालत आहे… दारु विक्रीचा परिणाम मुलाबाळांवरही होऊ लागला असून, दारुपायी संसार उघड्यावर पडत आहे… तेव्हा दारुबंदी त्वरित करावी, अशी मागणी करत महिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले.
कळमनुरी तालुक्यातील मुंढळ येथे काही महिन्यांपासून खुलेआम दारू विक्री होत आहे. त्यामुळे युवक वर्ग व्यसनाधिन बनत असून, घरातील कर्ता पुरुष दारु पित असल्यामुळे लहान मुलांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुंढळ गावातील संतप्त महिलांनी दि. 13 जुन रोजी कळमनुरीचे पोलिस स्टेशन गाठून दारू बंदी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंढळ व परिसरातील अनेक गावात सर्वच प्रकारची दारुण विक्री बंद नाही झाली तर पोलिस ठाण्यात बेमुदत उपोषण केले जाईल असा ईशारा पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर मच्छिंद्रनाथ वाघ, महादू पोटे, गफार खान, शेख शेरू, पद्माबाई सोनुले, चंद्रकला पोटे, दुर्गाबाई पोटे, बालाबाई पोटे, लताबाई पोटे, मालनबी शेख, विमल सोनुळे, विमल गुदाल, गोदावरीबाई मोरे, सुरेखा बेले, चंदा रोशने, देवानंद रोशने, शेख मुख्तार, शेख गफार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांना देण्यात आले आहे.
साहेब ! महिलांचा अंत पाहू नका…
दारुबंदी कायमची करा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु दारुबंदी विभागाला याचे काहीच वाटत नाही. आपल्याला दारु विक्रीतून महसूल मिळतो एवढे मात्र दारुबंदी विभागाला चांगले ठावूक आहे.
गरीब महिलांचे संसार दारुमुळे उघड्यावर येत आहेत, याचे काहीच दारुबंदी विभाग व तालुका प्रशासनाला काहीच वाटत नाही. महिलांचा अंत न पाहता लवकरात लवकर दारुबंदी करावी, असा इशाराही महिलांनी दिला आहे.





