Pune news : पावसामुळे पुणे शहरातील वाहतूक विस्कळीत; भिडे पूल, नदीपात्रातील पूल बंद !
शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

Pune news : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नदीपात्रातील इतर पूलही बंद आहेत. त्यामुळे मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खडकवासला धरण परिसरातही पाण्याचा विसर्ग वाढल्याने सिंहगड रस्ता आणि आसपासच्या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि बंद करण्यात आलेल्या पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास वाहतुकीवरील ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





