राज्यगीत गाणं आता बंधनकारक! शाळांवर कारवाईचा इशारा, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार हेल्थ कार्ड

मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मराठी शाळांप्रमाणेच आता इंग्रजी, हिंदी व अन्य माध्यमांच्या शाळांनाही राष्ट्रगीतानंतर राज्यगीत मानवंदनेने गाणे अनिवार्य असेल, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढणार –
शिक्षणमंत्री भुसे यांनी शिष्यवृत्ती परीक्षांच्या विस्ताराची घोषणा केली. पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केल्या जात होत्या. त्यानंतर पाचवी आणि आठवीच्या परीक्षा सुरू झाल्या. आता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड –
शालेय शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी औपचारिक स्वरूपात होत असे. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाद्वारे विद्यार्थ्यांची सखोल तपासणी होणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. हे हेल्थ कार्ड विद्यार्थ्यांना भविष्यात उपयुक्त ठरणार असल्याचे शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले.
शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक –
भंडारा येथे आयोजित शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना हे निर्देश दिले. उच्च दर्जाच्या शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.





