चोरट्यांना आळा घालण्यासाठी गर्दीच्या मार्गावर “वॉच’
पुणे – मागील काही दिवसांत पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी नागरिकांचे दागिने, रक्कम चोरल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली असून, बसमध्ये साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. विशेषतः गर्दीच्या मार्गावर पोलीस वॉच ठेवणार आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत शहरात पीएमपीच्या बसेसची संख्या कमी असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. याचा फायदा घेत चोरटे नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारला जात आहे. काही दिवसापूर्वी भेकराईनगर ते निगडी मार्गावर महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरल्याची घटना घडली. एकत्रितरित्या चार ते पाच महिला मिळून चलाखीने चोरी करत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यासारख्या प्रकारामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होत आहे. गर्दीच्या मार्गावरील पीएमपी बसने स्वतः पोलीस कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार आहेत. बसमध्ये प्रवासादरम्यान महिला पोलीसही सक्रीय राहणार आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे चोरीच्या घटनांना आळा बसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पीएमपीत चोऱ्या करणाऱ्या दोन टोळीला गुन्हे शाखेने अटक केली होती. या टोळीमध्ये काही महिलांचा समावेश असल्याचे दिसून आले. बसमधील चोरीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बसमध्ये गस्त घालणार आहेत.
– अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)