Silver and Gold Price: जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे आज सोने-चांदीच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळाली. चांदीच्या किमतीने सोमवारी सुरुवातीच्या सत्रात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर झालेल्या जोरदार विक्रीमुळे चांदी ७१२४ रुपयांनी स्वस्त झाली. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही घट झाली असून, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता दिसून आली. व्यवहाराच्या सुरुवातीला चांदीने २ लाख ५४ हजार १७४ रुपये प्रति किलोचा नवा विक्रमी स्तर गाठून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, किंमत सर्वोच्च पातळीवर पोहोचताच गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेण्यासाठी विक्री सुरू केली. या नफावसुलीच्या दबावामुळे चांदीचा वायदा भाव सुमारे ३ टक्क्यांनी कोसळून २ लाख ३२ हजार ६६३ रुपयांपर्यंत खाली आला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल ३१ हजार ३४८ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. सोन्याच्या बाबतीतही आज अशीच स्थिती पाहायला मिळाली. सत्राच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढीसह उघडले होते, परंतु नफावसुलीच्या लाटेत ही वाढ टिकू शकली नाही. सोन्याचा वायदा भाव १४९७ रुपयांनी घसरून १ लाख ३८ हजार ३७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याने १ लाख ४० हजार ४६५ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. जागतिक स्तरावरही कॉमेक्स बाजारात चांदीची किंमत ७३.७१ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली, तर सोन्याचे दर १.५९ टक्क्यांच्या घसरणीसह ४४८० डॉलरवर स्थिरावले. बाजार तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या किमती सध्या तांत्रिकदृष्ट्या अतिखरेदीच्या क्षेत्रात पोहोचल्या होत्या, त्यामुळे बाजारात घसरण होणे अपेक्षित होते. वर्षाच्या आणि महिन्याच्या अखेरीस अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक पुन्हा संतुलित करत असल्याने किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. आगामी काळात बुलियन मार्केटमध्ये आणखी काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला असून गुंतवणूकदारांना सध्याच्या परिस्थितीत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.