बारामती: पालखी सेवेसाठी सिल्व्हर ज्युबिली रूग्णालय सज्ज

बारामती – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. 18 जून रोजी बारामती शहरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे.
पालखीदरम्यान वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार, तातडीच्याप्रसंगी विशेष उपचार आदी सेवा रुग्णालयामार्फत देण्यात येणार आहेत. परिसराची स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, हॉटेल व्यावसायिकंना मार्गदर्शन, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, धूर फवारणीबाबत करावयाची कार्यवाही आदींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.
शाहू माध्यमिक विद्यालय येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य कर्मचारी यांचे पथक कार्यरत ठेवणे, पालखी तळावर रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी, परिचारिका 24 तास कार्यरत ठेवणे आदी सेवा देण्यासह उपजिल्हा रूग्णालयात माऊली आंतररुग्ण कक्ष पुरूष व महिला वारकऱ्यांसाठी कार्यरत राहणार आहे.
पालखी काळात वारकरी व भाविकांची आरोग्याबाबतीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांशी समन्वयाने काम करण्यात येईल, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.





