वाघोली परिसरातील घटना : चालकासह स्कूल प्रशासनास तंबी
वाघोली – स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थिनींशी चालकाने गैरकृत्य केल्याची घटना नुकतीच पालकांनी उघडकीस आणली. याबाबत चालकाची स्कूलकडे तक्रार करूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने वाघोली (ता. हवेली) येथील काही लोकप्रतिनिधींनी व्हॅन चालकास चोप देऊन स्कूल प्रशासनास तंबी दिली.
याप्रकरणी पालकांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला असल्याने चालकाला समज देऊन सोडण्यात आले आहे. परंतु पालकांनी स्कूल व्हॅनची खरी परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे.
वाघोलीतील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना नेण्याची जबाबदारी खासगी स्कूल व्हॅनकडे सोपविण्यात आली आहे. वाघोलीतीलच एका सोसायटीमध्ये विद्यार्थिनीला सोडण्यासाठी जात असताना व्हॅन चालक विद्यार्थिनीशी गैरकृत्य करीत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.
अनेक दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याच्या प्रकाराची व व्हॅनला असणाऱ्या काळ्या काचांबाबत तक्रार पालकांनी स्कूलकडे केली. मात्र स्कूल प्रशासनाने त्यास गांभीर्याने घेतले नाही.
संबंधित बाब वाघोलीतील काही लोकप्रतिनिधींना समजल्यानंतर त्यांनी पालकांसह स्कूल प्रशासनास जाब विचारला. व्हॅन चालकाला त्याठिकाणी बोलावून सर्वांसमोर चोप दिला.
याबाबत शाळा व व्हॅन चालकाला तंबी देऊन यापुढे असे प्रकार घडणार नाही याची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले. दरम्यान, पालकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
शैक्षणिक हब असलेल्या वाघोलीमध्ये शंभरहून अधिक शाळा, कॉलेज, प्री- स्कूल आहेत. सुमारे चारशेहून अधिक स्कूलबस व व्हॅन विद्यार्थ्यांची ने-आण करीत असतात. स्कूल व्हॅनमधील विद्यार्थिनींशी गैरकृत्य करण्याचा प्रकार कदाचित पहिल्यांदाच समोर आला असण्याची शक्यता आहे. मात्र, स्कूल व्हॅनमधून येणारा आपला पाल्य व स्कूल व्हॅनच्या परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज आता पालकांसह शाळा व्यवस्थापनावर असणार आहे. याबाबत पालकांनी जागरुक राहून आपल्या पाल्याची काळजी घ्यावी. काही अडचण निर्माण झाली तर स्थानिक लोप्रतिनिधी व पोलिसांशी संपर्क साधावा. – संदीप सातव,माजी उपसरपंच, वाघोली.