Sidra Amin : पाकिस्तानच्या खेळाडूला ‘ती’ कृती भोवली! भारत-पाक सामन्यानंतर आयसीसीने केली कारवाई

Sidra Amin Reprimanded by ICC : रविवारी आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीव्र क्रिकेट सामन्यात पाकिस्तानी फलंदाज सिद्रा अमीनच्या वर्तनाने सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानच्या डावातील 40व्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्नेह राणाने सिद्रा अमीनला हरमनप्रीत कौरच्या हाती झेलबाद केले. यानंतर बाद झालेल्या संतप्त सिद्राने आपली बॅट जोरात खेळपट्टीवर आपटली. या वर्तनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिला आचारसंहितेच्या भंगाबद्दल फटकारले.
आयसीसीची कारवाई आणि डिमेरिट गुण –
अमिन सिद्राला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.2 चा भंग केल्याचे दोषी ठरवण्यात आले. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे, कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जच्या गैरवापराशी संबंधित आहे. याशिवाय, सिद्राच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट गुण जोडण्यात आला.
Despite top-scoring with a fighting 81, Sidra Amin was penalized for breaching Article 2.2, relating to abuse of equipment, during Pakistan’s match versus India.#TOKSports #SidraAmin #ICCWomensWorldCup pic.twitter.com/Y90Z1Wqfz1
— TOK Sports (@TOKSports021) October 6, 2025
गेल्या 24 महिन्यांत हा सिद्राचा पहिला अपराध होता. लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी किमान अधिकृत फटकार ते खेळाडूच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट गुणांचा दंड आकारला जाऊ शकतो. सिद्राने आपला अपराध मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
हेही वाचा – Bernard Julien : वेस्ट इंडिजचा दिग्गज हरपला; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 247 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हरलीन देओलने 65 चेंडूंमध्ये सर्वाधिक 46 धावा जोडल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने 4 बळी घेतले, तर सादिया इकबाल आणि कर्णधार फातिमा सनाला प्रत्येकी 2-2 बळी मिळाले. प्रत्युत्तरात, पाकिस्तानी संघ 43 षटकांत केवळ 159 धावांत आटोपला. सिद्रा अमीनने 1 षटकार आणि 9 चौकारांसह सर्वाधिक 81 धावा केल्या. नतालिया परवेझने 33 धावांचे योगदान दिले. भारताकडून क्रांति गौड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 3-3 बळी घेतले, तर स्नेह राणाला 2 बळी मिळाले.





