सुरक्षा काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काॅंग्रेस नेता गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते आणि पंजाबी गायक सिध्दू मूसेवाला यांची मनसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पंजाबमधील भगवंत मान सरकारने कालच राज्यातील 424 जणांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. हे संरक्षण काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी हत्येची ही घटना घडली आहे.
मूसेवाला यांच्यावर अकाली दलाचे नेते विक्कू मिददुखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पुढच्या आठवड्यात त्यांचा एक कार्यक्रम गुडगाव येथे होणार होता. त्याची तयारी सुरू असतानाच ही हत्येची घटना घडली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच मूसेवाला यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता व मनसा येथून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे माजी आरोग्यमंत्री विजय िंसंगला यांनी त्यांना पराभूत केले होते. सिंगला यांना गेल्याच आठवड्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून ते सध्या तुरूंगात आहेत.





