पंजाबमध्ये ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्यांशिवाय निवडणूक प्रचाराला सुरुवात; कोणत्या पक्षाला बसणार फटका ?

Lok Sabha Election 2024 । २०२४ च्या लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदानासह मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. त्याच दिवशी पंजाबमधील लोकसभेच्या 13 जागांवरही मतदान होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत पंजाब मधील जनतेमध्ये लोकप्रिय मानले जाणारे काही शीख चेहरे प्रसिद्धीतून ‘गायब’ असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका नेमका कुठल्या पक्षाला बसेल याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा अशा नेत्यांच्या नावांमध्ये समावेश आहे.
अमरिंदर सिंग
82 वर्षीय अमरिंदर सिंग हे जवळपास दोन दशके पंजाबच्या निवडणुकीच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत, पण यावेळी त्यांची अनुपस्थिती पंजाबच्या जनतेसाठी नक्कीच वेदनादायी आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रॅलीत अमरिंदर सिंग मंचावर दिसले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची बिघडलेली प्रकृती आहे. प्रकाशसिंग बादल यांच्यानंतर अमरिंदर सिंग हे पंजाबमधील सर्वात अनुभवी नेते आहेत. ते सैन्यात कॅप्टन राहिले आहेत आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा भागही आहेत. 1980 मध्ये अमरिंदर सिंग यांनी लष्कर सोडून राजकारणात प्रवेश केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे शालेय मित्र होते.
अमरिंदर पत्नीच्या निवडणूक प्रचारालाही आले नाहीत.
अमरिंदर सिंग 1999 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 2002 आणि 2017 मध्ये त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. अमरिंदर सिंग यांनी 2021 मध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण केले. अमरिंदर सिंग यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याने भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार केला असता, तर भाजपला नक्कीच काही फायदा होऊ शकला असता
प्रनीत कौर पटियाला : शेतकऱ्यांचा विरोध होत आहे
अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर भाजपच्या तिकीटावर पटियाला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यांची मुलगी जय इंदर कौर या पंजाबमधील भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख आहे. अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये असताना ते पंजाब आणि बाहेरही पक्षाचा प्रचार करायचे.
पंजाबमधील शेतकरी सातत्याने भाजपला विरोध करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने भाजप उमेदवारांच्या विरोधात निदर्शने पुकारली आहेत. प्रनीत कौर यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
अमरिंदर आणि चन्नी यांच्याशी भिडणारे नवज्योतसिंग सिद्धू
नवज्योतसिंग सिद्धूही संपूर्ण निवडणूक प्रचारात पंजाबमध्ये दिसले नाहीत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सिद्धू समालोचक म्हणून उपस्थित होते. सिद्धू हे अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर खासदार होते पण काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिद्धू यांचे अमरिंदर सिंग यांच्याशी सतत वाद होत होते. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे होते पण अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले. नवज्योतसिंग सिद्धू यांना चरणजितसिंग चन्नी यांचीही साथ मिळाली नाही आणि या लढाईचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला आणि ते सत्तेतून बाहेर पडले.
निवडणुकीपूर्वी सिद्धू यांनी पंजाबमध्ये अनेक निवडणूक सभा घेतल्या. या रॅलींसाठी त्यांनी प्रदेश काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप झाल्यामुळे याबाबत प्रदेश काँग्रेसशी त्यांचे मतभेदही झाले होते.
सुखदेव सिंह धिंडसा पाच दशकांपासून राजकारणात
सुखदेव सिंह धिंडसा यांची गणना शिरोमणी अकाली दल तसेच पंजाबमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. धिंडसा यांनी 1972 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली. यानंतर त्यांनी अकाली दलाच्या तिकिटावर अनेक वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि पंजाबच्या अकाली दल सरकारमध्ये ते मंत्री होते. सुखदेवसिंग धिंडसा हे तीन वेळा लोकसभेचे आणि तेवढ्याच वेळा राज्यसभेचे सदस्य होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुलाला तिकीट न मिळाल्याने नाराजी
2018 मध्ये सुखदेव सिंह धिंडसा यांनी अकाली दलाचा राजीनामा दिला आणि शिरोमणी अकाली दल (युनायटेड) हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुखदेव सिंग धिंडसा यांनी त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दलात विलीन केला आणि अकाली दलाने त्यांच्या मुलाला परमिंदर सिंग धिंडसा यांना तिकीट न दिल्याने ते नाराज झाले. याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावरही टीका केली होती.
भाजप, काँग्रेसचे बडे नेते प्रचाराला पोहोचले
पंजाबमधील निवडणूक प्रचाराच्या मैदानावर या तीन बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीचा निवडणुकीवर निश्चितच परिणाम झाला. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप-काँग्रेसचे बडे नेते- राहुल गांधी, प्रियांका गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणुकीचे वातावरण अधिक धारदार करण्याचा प्रयत्न केला.
यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक प्रचारात आपली ताकद पणाला लावली. पंजाबमध्ये यावेळी आम आदमी पार्टी, काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजप सर्व 13 जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बहुतांश जागांवरची लढत चौरंगी झाली आहे.





