Siddharth Jadhav : आता थांबायचं नाही.! सिद्धार्थ जाधवच्या हाती अखेर ‘ब्लॅक लेडी’; अभिनेत्याची भावूक पोस्ट चर्चेत…
या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Siddharth Jadhav : नुकताच पार पडलेल्या 11 व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृती आणि कलाकारांचा दिमाखदार गौरव केला. झगमगत्या रोषणाईत, ग्लॅमरने नटलेल्या या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. (Siddharth Jadhav)
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाही’ या चित्रपटाची. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता पुरस्कारांच्या रूपानेही आपल्या यशावर शिक्कामोर्तब केले आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटाने एकापाठोपाठ एक महत्त्वाचे पुरस्कार पटकावत सोहळ्यावर अक्षरशः वर्चस्व गाजवले. याच चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवला सहाय्यक अभिनेत्याचा प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेचा विषय ठरत आहे.
‘आता थांबायचं नाही’ची पुरस्कारांवर मोहोर (Siddharth Jadhav)
View this post on Instagram
दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ‘आता थांबायचं नाही’ या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीदेखील भरभरून पसंती मिळाली होती. आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांसारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट विशेष गाजला.
त्याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत 11 व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गायक आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाला प्रतिष्ठेचा सन्मान (Siddharth Jadhav)
या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिद्धार्थने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले.
या फोटोंमध्ये तो बेडवर निवांत पडलेला दिसतो, तर त्याच्या शेजारी प्रतिष्ठेचा ब्लॅक लेडी अर्थात फिल्मफेअर पुरस्कार ठेवलेला आहे. आणखी एका छायाचित्रात तो प्रेमाने त्या पुरस्काराकडे पाहताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान चाहत्यांच्या मनालाही भावले आहे.
फोटो शेअर करत सिद्धार्थने अतिशय भावूक आणि आनंद व्यक्त करणारे कॅप्शन लिहिले. त्याने म्हटले, “सुपरहॅपी… wowowowowo… थँक्स फिल्मफेअर… ‘आता थांबायचं नाही’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार. ‘आता थांबायचं नाही’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. लव्ह यू फॉरेव्हर.” सिद्धार्थची ही पोस्ट काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. हजारो चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.






