बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नियुक्तीविषयीचा एक नवा प्रस्ताव कॉंग्रेसमधून पुढे आला आहे. त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच, कॉंग्रेसचा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचा प्लॅन असावा, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाने आपल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेतील सदस्यांच्या नियुक्तीसाठी काही नावांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये सिद्धरामय्या यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे परिषदेचे अध्यक्षपद सोपवले जाणार असल्याचे समजते. तो प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच देण्यात आला. मात्र, त्याविषयीची माहिती रविवारी समोर आली. त्यापाठोपाठ सिद्धरामय्या यांच्याविषयीच्या अटकळींना तोंड फुटले. त्यानंतर स्वत: सिद्धरामय्या यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. मला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांमधून संबंधित माहिती मिळाली. नव्या नियुक्तीमुळे मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याचा अर्थ काढला जाऊ नये. त्या नियुक्तीविषयी मी कॉंग्रेस श्रेष्ठींशी बोलेन, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अर्थात, सिद्धरामय्या यांच्या नव्या नियुक्तीविषयीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय तर्क-वितर्कांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाची शक्यता प्रदेश कॉंग्रेसच्या गोटातूनच काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली. त्यानंतर सिद्धरामय्या ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होऊ लागला. तर, उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्याकडे सुत्रे जाणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी लावून धरला. त्यामुळे कर्नाटक कॉंग्रेसमध्ये सत्तास्पर्धा सुरू झाल्याचे चित्र पुढे आले. त्याची दखल घेऊन कॉंग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी नुकताच कर्नाटक दौरा केला. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या आमदार, खासदारांशी चर्चा केली. त्यामुळे कॉंग्रेस मुख्यमंत्री बदलाच्या शक्यतेची चाचपणी करत असल्याचे मानले गेले. मात्र, त्या मुद्द्यावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्वत: सुरजेवाला यांनी नमूद केले. साहजिकच, तूर्त मुख्यमंत्री बदलाचा विचार कॉंग्रेस करत नसल्याचा अर्थ त्यामधून काढला गेला. मात्र, सिद्धरामय्या यांच्या प्रस्तावित नियुक्तीची माहिती पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. आता पुढील काही दिवसांत कर्नाटकमध्ये नेमके घडणार काय या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची चिन्हे आहेत.