Siddaramaiah : दलित पंतप्रधान बनवण्याची भाजपला सुवर्णसंधी; सिद्धरामय्या यांचा पलटवार

बंगळुरू : सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दलित पंतप्रधान बनवण्याची सुवर्णसंधी भाजपला प्राप्त होणार आहे, असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरूवारी केला. भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी नुकतेच कॉंग्रेसला आव्हान दिले.
मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमातींविषयीची वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, असे विजयेंद्र यांनी म्हटले. त्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. खर्गे हे केवळ कॉंग्रेसचे अध्यक्ष नसून आदरणीय मुत्सद्दी आहेत. दलित कार्डचा वापर करून त्यांनी मोठी राजकीय उंची प्राप्त केलेली नाही. त्यामागे अनेक दशकांचे समर्पण, जनसेवा यांसारखे घटक कारणीभूत आहेत.
कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल ते आमचा पक्ष ठरवेल; भाजप नव्हे. इतरांना लेक्चर देण्याऐवजी भाजपने पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून दलित नेत्याच्या नावाचा प्रस्ताव द्यावा. दलित पंतप्रधानासाठीची प्रक्रिया भाजपने सुरू करावी, असे म्हणत त्यांनी भागवत यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जबाबदारीतून मुक्त होण्याविषयीचे वक्तव्य नुकतेच भागवत यांनी केले. ते वक्तव्य भागवत आणि मोदी या दोघांनाही लागू होत असल्याच्या प्रतिक्रिया त्यानंतर कॉंग्रेसच्या गोटातून दिल्या जात आहेत. तो पक्ष भागवत आणि मोदी हे दोघेही लवकरच वयाची पंचाहत्तरी पार करणार असल्याकडे लक्ष वेधत आहे. कॉंग्रेसची ती भूमिका पुढे नेत सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला.





