सातारा – खंडाळा शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा

खंडाळा -खंडाळा शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी खंडाळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांकडून खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा उज्वला संकपाळ, उपनगराध्यक्ष सुधीर सोनवणे, माजी नगराध्यक्षा नंदाताई गायकवाड, नगरसेविका मोनिका मोरे, हेमलता ठोंबरे, शितल खंडागळे, पुष्पा खंडागळे, नगरसेवक संदीप गाढवे, शैलेश गाढवे, योगेश संकपाळ, रामचंद्र गाढवे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा हे तालुकास्तरीय शहर असल्याने शाळा, कॉलेजसह सर्व प्रशासकीय कार्यालय असल्याने विद्यार्थी, महिला व नागरिकांची मोठी वर्दळ असते. काही दिवसांपूर्वीच खंडाळा तालुक्यातील एका गावात विनयभंगाच्या घटनेतून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होवू नये यासाठी खंडाळा परिसरातील दारू, मटका, जुगार, चक्री (बिंगो),लॉटरी असे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.





