काळूबाई मंदिर परिसरात शुकशुकाट; विश्वस्त व निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा

मांढरदेव (वार्ताहर) – महाराष्ट्र व इतर राज्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव, ता. वाई येथील काळूबाईदेवीची यात्रा गुरुवारपासून सुरू झाली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने यात्रेवर बंदी घातल्याने काळूबाई मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

मंदिर परिसरातील दुकाने बंद होती. मांढरदेव परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याने भाविकांना 14 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी असल्याने त्यांच्याविना यात्रा झाली. विश्‍वस्त व निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य दिवी देवीची महापूजा करण्यात आली.

दरम्यान, काल (दि. 27) रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली. निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीचा जागर करण्यात आला.

यात्रेनिमित्त सकाळी देवीचा गोंधळ घालण्यात आला आणि सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व अतिरिक्‍त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे,

तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त व जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, ऍड. मिलिंद ओक, सीए. अतुल दोशी, चंद्रकांत मांढरे, जीवन मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेंद्र क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सचिन चोपडे व मोजके पुजारी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर अतिशय सुंदर दिसत होते.

मांढरदेव परिसरात जमावबंदी आदेश असल्याने पोलीस व जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती. डॉ. शीतल जानवे-खराडे व वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, 87 पुरुष व 20 महिला वाहतूक कर्मचारी, 24 होमगार्डस्‌, दंगा काबू पथक, जलद प्रतिसाद दलाची तुकडी, असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मांढरदेवीला येणाऱ्या भाविकांना भोर येथील छ. शिवाजी चौक, वाई एमआयडीसी व कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.