Shubman Gill ruled out ODI Series : युवा फलंदाज शुबमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर राहणार आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. ३० नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होत आहे. ही केवळ मानेची साधी दुखापत नसून, गिलला विश्रांतीची गरज आहे आणि भारतीय टीम व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनासाठी कोणतीही घाई करणार नाही. त्यामुळे आता कर्णधारपदाचे दावेदार कोण आहेत? जाणून घेऊया. कर्णधारपदाचे दावेदार आणि फलंदाजी समीकरण – शुबमन गिलच्या अनुपस्थितीत कर्णधारपदासाठी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, अनुभवी केएल राहुल आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा यांच्या नावांवर विचार केला जाऊ शकतो. सध्या दुसऱ्या कसोटीत कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंत वनडे कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहे. सलामीच्या जोडीत रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर अभिषेक शर्मा राखीव सलामीवीर म्हणून संघात असू शकतो. गोलंदाजीचे समीकरण – वेगवान गोलंदाजीची जबाबदारी हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. वर्कलोड लक्षात घेता जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. दुखापतीने त्रस्त असलेला हार्दिक पंड्या पुढील वर्षाच्या विश्वचषकापर्यंत केवळ टी-२० सामनेच खेळणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे कुलदीप यादवने ब्रेक घेतल्यास, फिरकीची धुरा अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांवर असेल. हेही वाचा – Smriti Palash Wedding : विजयाची सवय कायम! लग्नापूर्वीच्या सामन्यातही स्मृतीने पलाशच्या संघाला चारली धूळ, पाहा VIDEO प्रशिक्षक सीताराम कोटक काय म्हणाले? शुक्रवारी गिलला भारतीय कसोटी संघातून रिलीज करण्यात आले. तो १९ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला संघासोबत गुवाहाटीला गेला होता, पण त्याच्या मानेचा त्रास पूर्णपणे कमी झालेला नाही. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीताराम कोटक यांनी गुरुवारी सांगितले की, “खेळादरम्यान त्याची अस्वस्थता वाढू नये अशी आमची इच्छा आहे.” गिलच्या अनुपस्थितीत पंत दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करत आहे. गिलच्या दुखापतीची स्थिती काय आहे? कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान फलंदाजी करताना गिलला मानेमध्ये ताण जाणवला होता, ज्यामुळे तो गुवाहाटी कसोटीतूनही बाहेर पडला. सूत्रांनुसार, ही दुखापत स्नायूंची आहे की अन्य ऊतींची, हे तपासण्यासाठी सध्या मुंबईत त्याचे एमआरआयसह इतर आवश्यक टेस्ट सुरू आहेत. निवडकर्त्यांना आशा आहे की गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल.