Shubman Gill : निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची ‘स्पेशल’ तयारी; विराट-रोहितसाठी खास शेफ, तर गिलसाठी ३ लाखांचं मशीन!”

Shubman Gill 3 lakh water machine : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. स्ध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघांवर विजयाचा दबाव आहे. मात्र, या सामन्यापेक्षा सध्या भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल एका विशेष मशीनमुळे चर्चेत आला आहे. इंदूरमधील पाण्याच्या संकटामुळे गिलने स्वतःच्या सुरक्षेसाठी मोठी खबरदारी घेतली आहे.
३ लाखांचे वॉटर प्युरिफायर मशीन सोबत –
मिळालेल्या माहितीनुसार, शुबमन गिलने इंदूरला येताना आपल्यासोबत सुमारे ३ लाख रुपयांचे एक विशेष ‘वॉटर प्युरिफिकेशन मशीन’ आणले आहे. हे मशीन त्याने हॉटेलमधील स्वतःच्या रूममध्येच बसवून घेतले आहे. हे मशीन साधे आरओ (RO) किंवा बाटलीबंद पाणी देखील पुन्हा एकदा पूर्णपणे शुद्ध करण्यास सक्षम आहे. इंदूरमधील भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता गिलने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा हाहाकार –
देशातील सर्वात स्वच्छ शहर मानल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे भीतीचे वातावरण आहे. भागीरथपुरा भागात खराब पाण्यामुळे आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. १६ हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून डेंग्यू आणि डायरियाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना कोणताही धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
बीसीसीआयकडून खेळाडूंसाठी स्पेशल ‘शेफ’ –
केवळ पाणीच नाही, तर खेळाडूंच्या अन्नाबाबतही बीसीसीआय (BCCI) अत्यंत सतर्क आहे. खेळाडूंच्या फिटनेस आणि डाएटसाठी बोर्डाने खास शेफ सोबत पाठवले आहेत.
- विराट कोहली: विराटच्या आहारात प्रामुख्याने उकडलेले आणि वाफवलेले (Steamed) अन्न आहे.
- रोहित शर्मा: रोहितच्या डाएटमध्ये बदाम, स्प्राउट्स, ओट्स, फळे, पनीर, डाळ आणि भाताचा समावेश आहे.
प्रत्येक खेळाडूच्या शरीराची गरज ओळखून हे शेफ वैयक्तिक स्तरावर जेवण तयार करत आहेत.
विराट कोहली पितो फ्रान्समधून आयात केलेले इव्हियन नॅचरल स्प्रिंग वॉटर –
हॉटेल आणि मैदानात पॅक केलेल्या बाटल्या आणि आरओ वॉटरसह शुद्ध पाण्याची पुरेशी व्यवस्था असली तरी, संघ येथे विशेष खबरदारी घेत आहे. विराट कोहली एका विशेष प्रकारचे पाणी देखील पितो; त्याच्या सर्वात महत्वाच्या आरोग्य सवयींपैकी एक म्हणजे नेहमी हायड्रेटेड राहणे. विराट हा नियम इतका गांभीर्याने घेतो की तो फ्रान्समधून आयात केलेले इव्हियन नॅचरल स्प्रिंग वॉटर पितो, ज्याची किंमत प्रति लिटर सुमारे ४,००० रुपये आहे.





