Maratha Reservation : आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन ! शेवटच्या पत्रात केली ‘ही’ मागणी

नांदेड – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आणखी एका तरुणाने आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच मुंबई, हिंगोली, बीड येथे मराठा आरक्षणासाठी तिघांनी आत्महत्या केल्या आहेत. आता नांदेडमधील (Nanded) एका तरुणानेही विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आत्महत्या करणाऱ्या तरुणाने केली आहे. (Maratha Arakshan Sucide)
नांदेडमधील हदगाव तालुक्यातील वडगाव येथे शुभम सदाशिव पवार (Shubham Pawar) या तरुणाने विष पिऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे मराठा समाज संतप्त झाला आहे. यापार्श्वभूमीवर आज हदगाव- तामसा येथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा गावागावांतील मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे. तसेच, सर्वपक्षीय नेत्यांनाही गावबंदी करत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी बीडमध्येही एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या तरुणाने शुक्रवारीदेखील (20 ऑक्टोबर) झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता तरुणाने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे.
रिक्षाचालकाने संपवले जीवन
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये शनिवारी रात्री एका रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे (44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीड तालुक्यातील ससेवाडी येथील मूळ रहिवासी असलेले जगन्नाथ पांडुरंग काळकुटे हे रिक्षाचालक आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते बीड शहरातील गोविंदनगर भागात वास्तव्यास होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते. आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेतही ते सहभागी झाले होते.




