Shruti Haasan | अभिनेत्री श्रुती हासनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. फ्लाइटच्या उशीर होण्यामुळे श्रुतीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत तिने आपला संताप व्यक्त केला आहे. श्रुतीने ‘एक्स’वर एका नामांकित एअरवेजच्या सेवेला उद्देशून ट्वीट केले. ती म्हणाली, “मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सहसा तक्रार करीत नाही. पण आज एका नामांकित एअरवेज कंपनीने फारच गोंधळ घातला आहे. आम्ही चार तासांपासून विमानतळावर अडकलो आहोत आणि अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. कृपया, तुमच्या प्रवाशांसाठी योग्य आणि स्पष्ट माहिती द्या.” श्रुती हासनच्या या ट्वीटवर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देत विमान कंपनीच्या ग्राहक सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. श्रुती हासनच्या ट्वीटला उत्तर देताना विमान कंपनीने म्हटले, “मॅडम हासन, फ्लाइटच्या विलंबामुळे झालेल्या गैरसोईबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आम्हाला समजते की, इतका वेळ वाट पाहणे खूप त्रासदायक असते. हा विलंब मुंबईतील हवामानामुळे झाला आहे; ज्याचा परिणाम विमानाच्या आगमनावर होत आहे. आम्हाला आशा आहे की, आपण हे समजून घ्याल की, या परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि आमचे विमानतळावरील कर्मचारी आपल्या सोय आणि मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.” श्रुती हासनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘डकैत’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती शेवटची प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट १ : सीजफायर’ या चित्रपटात दिसली होती.