Shrirang Barne: कासारवाडीकरांची डोकेदुखी वाढणार? रेल्वेच्या ‘त्या’ निर्णयावर खासदार श्रीरंग बारणे आक्रमक
Shrirang Barne: स्थानिकांची संमती न घेताच ना-हरकत प्रमाणपत्र दिल असल्याचा आरोप; उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार होईपर्यंत फाटक पूर्ववत ठेवण्याची मागणी.

Shrirang Barne – मावळ लोकसभा मतदारसंघातील कासारवाडीगाव रेल्वे मार्गामुळे पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले असून, रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक ६१ हा या दोन्ही भागांना जोडणारा एकमेव व अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. हे फाटक कायमस्वरूपी बंद झाल्यास दररोज हजारो नागरिकांना अनावश्यकपणे मोठा वळसा घालावा लागेल. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासावर,
सामाजिक व आर्थिक व्यवहारांवर तसेच सर्वसामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम होईल. फाटक बंद करण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून फाटक पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे. खासदार बारणे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,
मावळ लोकसभा मतदारसंघातील कासारवाडी येथील रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आली असून, त्यासंदर्भात स्थानिक नागरिकांनाही माहिती देण्यात येत आहे. अंत्यसंस्कार, अंत्ययात्रा तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस व इतर अत्यावश्यक सेवांकडूनही याच मार्गाचा वापर केला जातो.
फाटक बंद झाल्यास आपत्कालीन सेवांच्या हालचालींमध्ये विलंब होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. रेल्वे विभागामार्फत कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे.
तथापि, सदर ना हरकत प्रमाणपत्र देताना स्थानिक नागरिकांची संमती, त्यांच्या गरजा तसेच जनभावनांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्याचे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी सदर ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल अथवा रेल्वे भुयारी मार्गाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. तो नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध झाल्यानंतरच रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.





