श्रीरामपूर: साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणावर संयुक्त कारवाई

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथील पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणावर आज सकाळी कारवाई करण्यात आली. ही कारवाई श्रीरामपूर नगरपरिषद आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी साठवण तलावात सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते, तसेच काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलन केले होते. त्यानंतर अतिक्रमण हटवण्याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी माहिती दिली होती.
आज झालेल्या कारवाईत नॉर्दन ब्रांच ते तलावाकडे जाणाऱ्या पाटावरील अडथळा ठरणारे शेड, कच्ची-पक्की बांधकामे व अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईसाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व पाटबंधारे विभागाचे अधिकारी कल्हापुरे यांच्या आदेशानुसार पथकाने कार्यवाही केली.
नगरपरिषदचे अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके, प्रशांत जगधने, सिद्धार्थ साळवे आणि सुनील केदारे यांनी ही कारवाई पार पाडली.
कार्यवाही दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.





