Shrirampur: हरित क्रांतीचे जनक, थोर कृषितज्ज्ञ व माजी केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आझाद मैदान, मेनरोड, श्रीरामपूर येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली. या व्याख्यानमालेस माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार संजय आवटे हे विशेष उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मीनाताई जगधने, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही व्याख्यानमाला तब्बल नऊ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होत आहे. या निमित्ताने श्रीरामपूरकरांना एक सक्षम वैचारिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्ष कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.