Ahilyanagar News : अहिल्यानगरात ‘साम टीव्ही’च्या प्रतिनिधीवर प्राणघातक हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईसाठी श्रीरामपूर पत्रकार आक्रमक
अवैध धंद्यांचे काळे कारनामे चव्हाट्यावर आणणाऱ्या अहिल्यानगर (Ahilyanagar News) येथील 'साम टीव्ही'चे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Ahilyanagar News : अवैध धंद्यांचे काळे कारनामे चव्हाट्यावर आणणाऱ्या अहिल्यानगर (Ahilyanagar News) येथील ‘साम टीव्ही’चे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सत्य बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून गुंड प्रवृत्तीच्या सहा जणांनी थोरात यांना बेदम मारहाण करत थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या खळबळजनक घटनेचे तीव्र पडसाद श्रीरामपूरमध्ये (Ahilyanagar News) उमटले असून, हल्लेखोरांवर केवळ गुन्हा दाखल करून न थांबता त्यांच्यावर थेट ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ आणि जर्नलिस्ट असोसिएशन आक्रमक झाली आहे.
या संदर्भात श्रीरामपूर (Ahilyanagar News) शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, गुन्हेगारी प्रवृत्ती पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा संतप्त आरोप ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी केला.
तर थोरात यांच्यावरील हल्ला हा पूर्ववैमनस्यातून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याने सर्व सहा आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी ठाम भूमिका पत्रकार करण नवले व जयेश सावंत यांनी मांडली.
गेल्या काही दिवसांत अवैध धंदेवाल्यांची दहशत वाढत चालली असून राज्य शासन आणि गृह विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून गुन्हेगारांना जरब बसवावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनादरम्यान (Ahilyanagar News) ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, ॲड. बाळासाहेब आगे, नागेश सावंत, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, सलीमखान पठाण, राहुल मुथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चिते, रियाज पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






