Shrinath Mhaskoba Yatra : वीरमध्ये कुस्तीचा महाकुंभ! ५०० पैलवानांची उपस्थिती आणि बक्षिसांची खैरात; पाहा कोण ठरले मानकरी
Shrinath Mhaskoba Yatra : दिल्ली, पुणे, कोल्हापूरसह सोलापूरच्या पैलवानांनी गाजवला वीरचा आखाडा; कुस्तीशौकीनांची मोठी गर्दी.

Shrinath Mhaskoba Yatra – श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट आणि कुस्ती संयोजन समिती, वीर यांच्यामार्फत श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. यावेळी दिल्ली, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील पाचशे मल्लांनी सहभाग घेतला होता. गणेश जगताप ‘श्रीनाथ केसरीचा’ मानकरी ठरला. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व मान्यवरांच्या हस्ते गणेश जगताप याला दोन किलो वजनाची चांदीची गदा इनामी रक्कम देऊन सन्मानित केले.
आखाड्यात पाचशे मल्लांनी हजेरी लावली होती. कुस्ती आखाड्याच्या अंतिम लढत माऊली जमदाडे ( गंगावेस तालीम कोल्हापूर) व गणेश जगताप (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे) यांच्यामध्ये झाली. यामध्ये गणेश जगताप याने एकेरी कस चढवत नागपट्टी डावावर माऊली जमदाडे याला चितपट करून ‘श्रीनाथ केसरी’ ची मानाची गदा व एक लाखाचे रुपयांचे बक्षीस पटकावले. वीर येथील कुस्ती आखाडा पहाण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
विजेत्या मल्लांना रोख रक्कमेची बक्षिसे देऊन पैलवानांचे कौतुक केले जात होते.पप्पू धडस (फलटण), आकार गारडी (सदाशिव नगर), बाळू पिसाळ (स्वराज आखाडा), प्रकाश ताटे (पुणे) यांच्या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या. विजयी मल्लांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून वीर गावचे पैलवान संग्राम धुमाळ, पै. दिगंबर धुमाळ, पै. लक्ष्मण जाधव, प्रतीक सोनवणे यांनी काम केले.
कुस्ती आखाड्याचे समालोचक पै. अनिकेत कदम (फलटण) यांनी केले. संजय आवळे (कोल्हापूर) यांच्या हलगी पथकाने आखाड्याला शोभा आणली. अमर धुमाळ, रुपेश धुमाळ, मंगेश धुमाळ, सूरज धुमाळ, कुस्ती नियोजन समितीच्या वतीने या कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते.
बक्षिसांची खैरात
मानाच्या पालख्या व काट्यांना भक्तीमय वातावरणात वीर येथील ग्रामस्थांनी निरोप दिल्यानंतर संध्याकाळी कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. दिल्ली, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील पाचशे मल्लांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती आषिश वावरे व विजय पाटील यांच्यात झाली. आशिष वावरे याने विजय पाटील याला घिस्सा डावावर चितपट करून ५१ हजार रुपयांचे इनाम पटकावले. तीन नंबरसाठी ब्रम्हा बुरंगले आणि राहुल कोकरे यांच्यामध्ये झाली. ब्रम्हा बुरुंगले याने राहुल कोकरे याला ढाक डावावर चितपट करून २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.





