Shrikant Shinde : कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल 15 डब्यांच्या करा; खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी
रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी लोकसभेत सादर केले.

Shrikant Shinde : मध्य रेल्वेवरील कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा सीएसएमटी जलद लोकल, कोपर-वसई रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पाला गती आणि प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करावेत, अशा रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी लोकसभेत सादर केले.
खासदार डॉ. शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले, कल्याण मतदार संघातील ८० टक्के प्रवासी लोकलचा वापर करतात. त्यामुळे कल्याण मार्गावर सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे आवश्यक आहे. कोकण मार्गावरील मेल एक्सप्रेस फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची सुविधा पुन्हा सुरु करावी. कल्याण लोकसभा मतदार संघात आजच्या घडीला ५ ते ६ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु आहेत.
पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेसाठी येथील प्रवाशी १५ ते २० वर्षांपासून वाट पाहत होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कल्याण मतदार संघातील रेल्वेच्या कामांना गती मिळाली. आज ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. तसेच कल्याण ते अंबरनाथपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरु आहे.
मात्र ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी आवश्यक भूसंपादन, रेल्वे मार्गावरील झोपड्यांचा प्रश्न आणि नागरिकांचे पुनर्वसन याबाबत रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. याबाबत राज्य सरकार, एसआरए यांच्यासोबत चर्चा करुन धोरण बनवावे, असे खासदार डॉ. शिंदे (Shrikant Shinde) यांनी सुचवले.






