Shrirampur : श्रीरामपुरात 15 जूनला श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका यात्रेचा भक्तिमय सोहळा
Shrirampur : अक्कलकोटचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पावन पालखी-पादुका यात्रेचे श्रीरामपूर शहरात सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आगमन होणार असून, या निमित्ताने शहरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

Shrirampur : अक्कलकोटचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पावन पालखी-पादुका यात्रेचे श्रीरामपूर शहरात सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आगमन होणार असून, या निमित्ताने शहरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा या पालखी यात्रेचे श्रीरामपुरातील २९ वे वर्ष असल्याने स्वामीभक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही पालखी-पादुका यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांत भ्रमण करत असून, हजारो भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम ठरत आहे. अक्कलकोटला प्रत्यक्ष दर्शनासाठी जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची आणि कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची ही सुवर्णसंधी मानली जाते.
पालखीचे आगमन दि. १५ जून रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या व्यापारी मंगल कार्यालयात मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत भजन, कीर्तन, नामस्मरण, धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी वैजापूरकडे रवाना होणार आहे.
या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी श्रीरामपूर शहर व पंचक्रोशीतील स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट तसेच शहर व तालुक्यातील स्वामीभक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा श्री स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेची ऊर्जा देणारा ठरत असून, या पालखी सोहळ्यामुळे श्रीरामपूर नगरी पुन्हा एकदा स्वामीमय वातावरणाने भारावून जाणार आहे.





