Pimpari : श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे ऊस लागवड करिता धोरण जाहीर

हिंजवडी : कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ सभेत झालेल्या निर्णयाप्रमाणे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीबाबत कारखान्याने शेतकरी हिताचे धोरण जाहीर केले आहे.
कारखान्याचा ऊस लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये हंगामामध्ये कमी कालावधीत जादा टनेज उत्पादन देणारे ऊस बेणे को.८६०३२ या बेण्यास प्राधान्य देऊन इतर जाती को. व्हिएसआय-१८१२१, व आडसाली, पूर्वहंगामाकरिता को.एम.०२६५ ऊसाच्या लागवडीकरिता बेणे उधारीवर देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड होण्याच्या दृष्टीने लागवड हंगामात शेतकऱ्यांना कारखान्याच्या शिफारशीप्रमाणे चांगल्या प्रतीचे बेणे, उधारीवर पोहोच करणे, कारखाना साईटवरील नर्सरीमधून शेतकऱ्यांना ऊस रोपे वाटप, तसेच ऊस उत्पादनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी येथून उत्पादित द्रवरूप मल्टीमायक्रोन्युट्रंट, मल्टीमॅक्रोन्युटंट, जैव कीड नियंत्रण (EPN) जैव संजीवक (वसंत उर्जा) इ. खते उधारीवर वाटप करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे जमीनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते-ताग बियाणे, ऊस पिकांवर किटक नाशक व बुरशी नाशक ड्रोनद्वारे फवारणीसाठी सवलतीच्या दराने ड्रोनची सुविधा, फवारणीसाठी खते, बायोकंपोस्ट खत, पाचट कुजविण्यासाठी जिवाणू कल्चरचे वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून शेतकऱ्यांना संशोधन केंद्रावर प्रशिक्षणासाठी ५०% फी कारखान्यामार्फत भरून पाठविण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी बँकेस हमी देणे याचबरोबर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान प्रति टन रू.५०/- याप्रमाणे देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आल्यानंतर एफआरपी. व्यतिरिक्त जादा तसेच ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन करणेसाठी एकरी रूपये पाच हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी दिली आहे.
आर्टिफिशीयल इन्टेलिजन्सचा वापर करणार
कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस संशोधन केंद्र बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट यांचे संयुक्ताने कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशीयल इन्टेलिजन्स -एआय) तंत्रज्ञान ऊस पिकांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने योजना राबविली आहे. सदर योजनेमध्ये कारखान्याने सहभाग घेतलेला आहे. त्याकरिता उत्सुक शेतकऱ्यांनी आपली नांव नोंदणी कारखान्याचे शेतकी ऑफिसमध्ये करावी असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी केले आहे.





