नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गोधेगाव येथील जन्मभूमी मंदिरात येत्या शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) रोजी जन्मदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा जन्मदिन सोहळा साजरा होणार आहे. प्रवरा नदीच्या तीरावर वसलेल्या गोधेगाव या पवित्र क्षेत्रात दत्तावतारी किसनगिरी बाबांचा जन्म झाला. प्रवरा माईच्या काठावर तपश्चर्या करून त्यांनी भगवान दत्तात्रेयांना प्रगट केले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्री क्षेत्र देवगडचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आध्यात्मिक अधिष्ठान बनले आहे. या जन्मदिन सोहळ्याच्या निमित्ताने भास्करगिरीजी महाराज स्वत: उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते किसनगिरी बाबांच्या जन्मस्थानाचे पूजन होईल. याप्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन होणार असून, आमटी-भाकरी प्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. किसनगिरी बाबा भक्त मंडळाने पंचक्रोशीतील सर्व भाविकांना या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.