पिंपरी, (प्रतिनिधी) – कामगार नेते तथा शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील गरीब, गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनसेवेचा खरा वसा इरफान सय्यद यांनी घेतला आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकहिताचे उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे कार्यकर्ते करत असतात. मोठा जनसंपर्क व मित्र परिवार असणारा हा सर्वसमावेशक नेता आहे, असे उद्द्गार आढळराव पाटील यांनी शुभेच्छा देताना काढले. गोरगरीब विद्यार्थ्यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवडनगरी ही कामगारनगरी आहे. या नगरीत माथाडी कामगार, इतर कामगारांचे प्रतिनिधित्व इरफान एक शिवसेना नेते म्हणून करत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. कामगारांच्या मागण्यांना तुम्ही न्याय मिळवून देता, ही गर्दी त्याचीच साक्ष आहे, अशा शब्दांत बारणे यांनी इरफान सय्यद यांना शुभेच्छा दिल्या. भोसरी मतदार संघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणेच यंदाही वृत्तपत्रविक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पिंपरी चिंचवड शहर, इरफानभाई सय्यद युवा मंच, साद सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र मजदुर संघटना यांनी केले होते. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना भेटून आशीर्वाद घेतले. तर राज्य मंत्रीमंडळातील विविध खात्याचे मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, राजकीय नेते यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यमुनानगर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, अमित गोरखे, तुषार हिंगे, प्रवीण भालेकर, प्रसाद शेट्टी, सीमा साळवे, भगवान पोखरकर, अजित गव्हाणे आदींनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.