लोककलेतील श्री गणेश

संत, पंत आणि तंत म्हणजे शाहीर या तीनही संप्रदायांनी गणेशाचे संकीर्तन केले आहे. भारुड, लळित, दशावतार, बोहाडा अशा भक्तीनाट्यांमध्ये गणेशाचे अवतरण होते.
प्रतिष्ठान (पैठण) येथे सातवाहन राजांच्या कारकिर्दीत रतिनाट्यासारखे कलाप्रकार सादर करण्याची प्रथा होती. याची सुरुवात मंगलाचरणाने होत असे. यास गण असे संबोधतात. कार्यारंभी आशीर्वचन प्राप्तीसाठी, सकल कलांच्या देवतेकडून रंगऊर्जा घेण्यासाठी आणि अरिष्टांचे निवारण व्हावे म्हणून गणेशाची स्तुती गीते म्हणजेच गण म्हणतात.
अग्रपूजेचा अधिकारी गणेशाला संगीत, नाट्य, नृत्य लोककला या प्रांतात प्रथम नमन केले जाते. लोककलेमध्ये गणेश वंदना आणि गणेश स्तुती यावर लालित्यपूर्ण कवने रचून गण म्हणण्याची प्रभावी परंपरा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणरायाच्या रूपाचे, लीलांचे वर्णन करून भक्तिभावाने आळवले जाते. गणातील गणपती बालरुपात, विद्येचा अधिपती म्हणून व विघ्नविनाशक रूपात रंगभूमीवर अवतरतो.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहीर अनंत फंदी, राम जोशी, शाहीर प्रभाकर, उमा मांग सावळजकर, हैबती घाटगे, सगनभाऊ जेजुरीकर, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव या शाहिरांनी गणेश स्तुतिपर कवने लिहिली आहेत. यापैकी शाहीर सगनभाऊ जेजुरीकर म्हणतात,
रंगरूप ज्ञानकळा,
अगाध ही तुझी लीला
सरळ सोंड वक्रतुंड हे गजानना सभेमध्ये यावे तुम्ही पायी घुंगरू वाजताती,
सभेमध्ये नाचताती,
द्यावी मला ज्ञानमती, कुलभूषणा
तर पठ्ठे बापूराव म्हणतात,
गण माझ्या अंगणी नाचीत आलेला सारथी बनीला,
माझ्या मनाचा पाझर खणला,
चौदा विद्येचा द्रुपद,
नवरस गायनी खूप रंग जमला,
कवने केली. तसेच, शाहीर होनाजी बाळा यांनी
गजवदन बहुत गोजिरे,
मस्तकी बरे दुर्वांकुर तुरे,
चतुष्करी चित्रविचित्रे मूषकध्वज,
लंबोदरा सिंदूर ध्यान
जे जपती मंत्रे,
भजियेला एकदंत, सिद्धिविनायक,
तो सुखदायक,
हे गुणनायक हृदयी धरती
अशी गणेश वंदना करतात. आणि
लवकर यावे सिद्ध गणेशा,
आत मधी कीर्तन वरून तमाशा, माझा भरवसा तुम्हावर खासा, विघ्न पिटविशी दाही दिशा
अशी प्रार्थनाही करतात.
शाहीर प्रभाकर यांनी
गौरीसुता लंबोदरा ये,
सिंदूर मर्दन विघ्नहरा ये,
मती दे गजानना परशुधरा ये, गीतप्रसंगी रे करी आज सिद्धी गातो, आधी तुला विघ्नहरा ये
अशी गणेश स्तुती करतात. शाहीर राम जोशी,
गौरी नंदना, अमर वंदना, दैत्य कंदना, हे मंगलमूर्ती, ठेवी कृपादृष्टी एकदंत दीनावर पूरती
अशी आळवणी करतात.
अशाप्रकारे लोककलावंतांनी गणरायाला रंगभूमीची देवता म्हणून अग्रपूजनाचा मान दिला आहे. गणाचे प्रयोजन गणेश आराधना असले तरी रसिकांना बोध देण्याचे व लोकरंजनातून लोकशिक्षण देण्याचे मोलाचे कार्यही त्यांनी केले आहे.
सौ. माधुरी शिवाजी विधाटे




