ज्ञानदेवांचा श्री गणेश

ज्ञानदेव श्री गणेश वंदनेच्या एकोणिसाव्या ओवीत श्री गणेशाचे रूप वर्णन करताना म्हणतात,
अकार चरण युगल।
उ कार उदर विशाल।
म कार मस्तकाकारे।
ते शब्दब्रह्म वाङ्मय म्हणजे प्रणवोत्पन्न असे गणेश मूर्त रूप होय. अर्थात या शब्दाचे अ, उ आणि म असे तीन स्वर असल्याने त्यातून त्यांनी हे मूर्ती रूप वर्णन केले आहे. हे श्री गणेशाचे निर्गुण स्वरूप प्रतीक आहे. ते मुळात ध्वनी रूप असून पुढे लेखनशास्त्र विकास पावल्यावर वर्णमाला निर्माण होऊन त्याचे अक्षर रूप साकार झाले.
काराची प्रथम मात्रा “अ’कार हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी “उ’ कार मात्रा त्याचे विशाल उदर आहे. तिसरी “म’ कार मात्रा त्याच्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद सामावला जातो.
हे तिन्ही एकवटले ।
तेथे शब्दब्रह्म कवळले ।
ते मिया गुरुकृपे नमिले ।
आदिबीजा।
या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन करुन त्याचे भव्य दिव्य रूप साकारले आहे.
गणपती अथर्वशीर्षातील
त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधारस्थितो।सि नित्य्ं।
या चरणातील “त्वं मूलाधारस्थितो।सि नित्य्ं।’ हा उल्लेख महत्वपूर्ण आहे. मानवी देहात षटचक्रे आहेत. गणेश देवतेचे लाल भडक रंगाचे मूलाधार चक्र, ब्रह्म देवतेचे शेंदरी रंगाचे स्वाधिष्ठान चक्र, विष्णू देवतेचे पिवळ्या रंगाचे मणिपूर चक्र आहे.
तसेच शंकर देवतेचे निळ्या रंगाचे अनाहत चक्र, जीवात्मा देवतेचे जांभळ्या रंगाचे विशुद्धी चक्र, आत्मा देवतेचे आज्ञाचक्र आणि विविध रंगाच्या सहस्त्र पाकळ्या असलेले सर्व नियंत्रक असे अध्यात्मिक विकासाचे केंद्र म्हणजे सहस्त्रार चक्र अशी षटचक्रे आहेत. त्यातील मूलाधार चक्रात गणेश ही नित्य स्थित देवता आहे. या मूलाधारावरच सर्व सजीव-निर्जीव स्थिर राहतात. या समतोल राखणाऱ्या एकमेव शक्तीलाच गणपती म्हणतात. तेव्हा विश्वाची मूलाधार शक्ती गणपतीच आहे.
मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृती करून तिला सुषुम्ना मार्गाने एक-एक चक्र जागृत करीत अखेर सहस्त्रार चक्रापर्यंत आणणे हाच कुंडलिनी योगाचा विकासाचा मार्ग आहे. कुंडलिनी जागृती म्हणजे मेंदूतील सुप्त असलेल्या पेशी कार्यरत होणे. त्या दृष्टीने कुंडलिनी जागृतीला विशेष महत्त्व आहे. आणि म्हणूनच गणेश उपासना महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे स्मृतींचे वचन सांगते,
“जेथे कार आकृती धारणा।
तोच गजानन जाणा।
ऋषीमुनींच्या मते सर्वश्रेष्ठ असा कार आहे. श्री गणेश आहे. त्यामुळे या अग्रदेवतेची उपासना, प्रार्थना श्रद्धापूर्वक अंतकरणाने केल्यास कोणतेही मंगल कार्य सिद्धीला जाते. कार सर्वात आद्य असून त्याची देवता श्रीगणेश सर्वश्रेष्ठ मानली जाते.
वेदांनाही अगोचर असा, महायोग्यांनाही थांग न लागणारा, स्वयंभू कार प्रणवरुप श्री गणेश मूलकारक म्हणून श्रेष्ठतम आहे. त्यामुळेच श्रीगणेश उपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना आहे. ही उपासना मानवाला ऐहिक, पारमार्थिक, लौकिक, बौद्धिक, शारीरिक, आंतरिक सुख व आनंद देते.
-सौ. माधुरी शिवाजी विधाटे




