Shreyas Iyer Record : श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा ऐतिहासिक विक्रम! आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच रचला नवा इतिहास
Shreyas Iyer Record : सूर्यकुमार यादवच्या जागी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा १५ वा कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या श्रेयसने महान फलंदाज रोहित शर्माचा एक न भूतो न भविष्यती असा विक्रम मोडीत काढला आहे.

Shreyas Iyer T20I Captaincy Debut Record Rohit Sharma : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बेलफास्टच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच भारताचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने नवा इतिहास रचला आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा १५ वा कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या श्रेयसने महान फलंदाज रोहित शर्माचा एक न भूतो न भविष्यती असा विक्रम मोडीत काढला आहे.
११४ सामन्यांच्या कप्तानीचा अनुभव; रोहितचा विक्रम धुळीस!
भविष्यातील क्रिकेटचा विचार करून बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. तब्बल ९३६ दिवसांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रेयसने कप्तानीच्या बाबतीत नवा जागतिक विक्रम केला. तो आता सर्वात जास्त टी-२० सामन्यांमध्ये कप्तानी केल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणारा खेळाडू बनला आहे.
SHREYAS IYER’S RECORDS AS CAPTAIN IN IPL. 🫡 pic.twitter.com/i1R1cO3DKU
— Tanuj (@ImTanujSingh) June 26, 2026
श्रेयस अय्यरने (आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट मिळून) तब्बल ११४ टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, त्यानंतर त्याला टीम इंडियाची कप्तानी मिळाली. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने ८० टी-२० सामन्यांमध्ये कप्तानीचा दांडगा अनुभव गाठीशी असल्यावर भारतीय संघाची धुरा सांभाळली होती.
सर्वात जास्त टी-२० सामन्यांनंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू:
- श्रेयस अय्यर: ११४ टी-२० सामने
- रोहित शर्मा: ८० टी-२० सामने
- विराट कोहली: ७२ टी-२० सामने
टी-२० कप्तानी पदार्पणात ठरला तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू –
बेलफास्टच्या मैदानावर वयाच्या ३१ वर्षे २०२ दिवस या वयात श्रेयस अय्यर भारताचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी उतरला. यासोबतच तो भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. या यादीत शिखर धवन (३५ वर्षे २३२ दिवस) पहिल्या क्रमांकावर असून सूर्यकुमार यादव (३३ वर्षे ७० दिन) दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वयाच्या ३० व्या वर्षी भारताची कप्तानी पहिल्यांदा भूषवली होती.





