IND vs IRE Series : आयर्लंडविरुद्ध भारताचा अजब विक्रम! ४ मालिका अन् ४ वेगळे कर्णधार; आयर्लंडविरुद्ध कप्तानी करणारा श्रेयस ६ वा भारतीय
IND vs IRE Series : भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यांचा एक अतिशय रंजक आणि अजब इतिहास समोर आला आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकूण प्रवासात भारताने तब्बल ६ वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवले आहेत.

IND vs IRE T20I Series Captaincy Record : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार २६ जूनपासून सुरू होत आहे. दुसरा सामना २८ जून रोजी खेळवला जाईल आणि हे दोन्ही सामने सायंकाळच्या सत्रात रंगणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवले आहे. श्रेयस पहिल्यांदाच भारतीय टी-२० संघाचे अधिकृत नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, या मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यांचा एक अतिशय रंजक आणि अजब इतिहास समोर आला आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकूण प्रवासात भारताने तब्बल ६ वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवले आहेत.
चार द्विपक्षीय मालिका आणि ४ वेगळे कर्णधार –
भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही एकूण चौथी टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही मालिकांमध्ये भारताचा कर्णधार नेहमी वेगळा होता आणि आता चौथ्या मालिकेतही बीसीसीआयने नवीन कर्णधाराची (श्रेयस अय्यर) घोषणा केली आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा २००९ च्या टी-२० विश्वचषकात आमनेसामने आले होते, तेव्हा संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे होती.
All set for a new beginning 🫡
Captain @ShreyasIyer15 addresses his first team huddle as #TeamIndia commence training at Belfast.#IREvIND pic.twitter.com/R1G2LMj2Zm
— BCCI (@BCCI) June 25, 2026
त्यानंतर २०१८ च्या मालिकेत विराट कोहली, २०२२ मध्ये हार्दिक पंड्या आणि २०२३ मधील मालिकेत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या कप्तानीखाली दोन्ही संघ भिडले होते. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या कार्यकाळात आयर्लंडविरुद्ध एकही सामना झाला नाही. आता २०२४ च्या प्रदीर्घ खंडानंतर २०२६ मध्ये श्रेयस अय्यर हा आयर्लंडविरुद्ध कप्तानी करणारा भारताचा ६ वा खेळाडू ठरणार आहे.
१५ पैकी ६ कर्णधार फक्त आयर्लंडविरुद्ध –
भारतीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण १५ खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले आहे. (यात वीरेंद्र सेहवाग भारताचा पहिला टी-२० कर्णधार होता, तर श्रेयस अय्यर १५ वा ठरला आहे). या १५ कर्णधारांपैकी एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हेच भारताचे पूर्णवेळ (प्रॉपर) कर्णधार राहिले आहेत. इतर कर्णधारांची संख्या वाढण्यामागे आयर्लंडसारख्या छोट्या मालिका कारणीभूत ठरल्या आहेत. भारताच्या एकूण १५ कर्णधारांपैकी ६ कर्णधारांनी थेट आयर्लंडविरुद्ध कप्तानी करण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे.





