Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने ICU मध्ये दाखल! मैदानात कधी परतणार?

कशी झाली दुखापत?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यादरम्यान ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन डावाच्या 34व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीचा झेल पकडताना श्रेयसच्या बरगड्यांना दुखापत झाली. बॅकवर्ड पॉइंटवर क्षेत्ररक्षण करताना मागे धावत जाऊन त्याने हा झेल घेतला, परंतु यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे तो वेदनेने विव्हळत मैदानावरच पोट आणि छाती धरून बसला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला तातडीने मैदानाबाहेर नेले आणि सिडनीच्या रुग्णालयात दाखल केले.
आगामी सामन्यांवर परिणाम –
Medical update on Shreyas Iyer. Details 🔽 #TeamIndia | #AUSvIND https://t.co/8LTbv7G1xy
— BCCI (@BCCI) October 27, 2025
भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे, परंतु श्रेयस या मालिकेचा भाग नाही. तरीही, दुखापतीच्या गंभीरतेमुळे संघ व्यवस्थापनाने त्याला उपचारासाठी सिडनीमध्येच थांबवले आहे. अहवालानुसार, श्रेयसला सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहावे लागू शकते.
हेही वाचा – ‘तो’ फोन येताच केला आयुष्याचा शेवट; भारतीय महिला खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल…
मैदानावर परतण्याची शक्यता –
क्रिकेटप्रेमींकडून श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार, असा प्रश्न विचारला जात आहे. सूत्रांनुसार, तो 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात खेळू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. श्रेयसच्या प्रकृतीबाबत संघ व्यवस्थापन आणि चाहते चिंतेत असून, त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.





