Shree Mahalakshmi Temple: मानवी मूल्ये जपण्याची जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापकांची-ज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव
Shree Mahalakshmi Temple:

श्री महालक्ष्मी मंदिरात ५० मानव संसाधन महिला व्यवस्थापिकांचा सन्मान
Shree Mahalakshmi Temple: महिलांसोबत विविध क्षेत्रांत काम करताना त्यांच्या बुद्धिमत्तेचा, दूरदृष्टीचा आणि नियोजन कौशल्याचा अनुभव आला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम असून, नियोजन आणि अंमलबजावणीतही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. उद्योग क्षेत्रात मानवी नातेसंबंध आणि संवेदनशीलता जपली पाहिजे. मानवी मूल्ये जपण्याची जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव यांनी रविवारी केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे विविध क्षेत्रांतील ५० महिला मानव संसाधन व्यवस्थापिकांचा भार्गव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
भार्गव म्हणाले, आयुष्यात महिलांसोबत काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजच्या काळात अनेक गोष्टी व्यवहारकेंद्रित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मानव संसाधन व्यवस्थापकांची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते.
ज्ञान, संपत्ती आणि शक्ती या तिन्ही गुणांच्या माध्यमातून देवीचे वर्णन केले जाते. महिलाही या तिन्ही गुणांचे प्रतीक आहेत. महिला मानव संसाधन व्यवस्थापिकांचा सन्मान करण्याची संधी मिळत असल्याबद्दल भरत अग्रवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आरोग्य शिबिरात ३५० महिलांची तपासणी
नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिरात ३५० महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार (दि. २० ऑक्टो) पर्यंत सुरू राहणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.





