U19 International Badminton Tournament : तारिणी सुरीने जिंकला दुहेरी बॅडमिंटनचा मुकुट…

U-19 Girls’ Doubles Title :- हैदराबाद येथील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये झालेल्या स्पर्धेत मुंबईच्या तारिणी सुरीने शानदार कामगिरीच्या जोरावर कोटक इंडिया ज्युनियर -१९ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन्ही गटाचे विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटाच्या दुहेरीच्या अंतिम लढतीत तारिणी व नाशिकच्या श्रावणी वाळेकर यांच्या जोडीने इंडोनेशियाच्या कायला पुत्री आणि मिचा वारदोयो याच्या जोडीला २१-१०, २१-१५ असे सरळ सेटमध्ये पराभूत करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या सेटपासूनच तारिणी आणि श्रावणी यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवताना विजय साकारला. उपांत्य फेरीत तारिणी आणि श्रावणी यांनी थायलंडच्या कोडचापोर्न चैचना आणि पन्नावी पॉलिअम या जोडीचा पराभव केला होता.
तारिणी व भव्य छाबरा यांच्या जोडीने थायलंडच्या अव्वल मानांकित अट्टावुत स्रीप्यू-पन्नावी पॉलिअम यांच्या जोडीला २१-१३, १९-२१, २१-१४ असे पराभूत करताना मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पहिला सेट पराभूत झाल्यानंतर थायलंडच्या खेळाडूंनी दुसरा सेट जिंकला होता. मात्र त्यानंतर तारिणी आणि भव्य यांच्या जोडीने आपला खेळ उंचावला व तिसरा सेटसह विजेतेपद पटकावले.
३० सप्टेंबरपासून चीनच्या नानचांग येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. तारिणी सध्या हुफ्रीश नरिमन यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.





