श्रद्धा कपूरने सांगितले हॉलिवूड सिनेमांच्या ऑफर नाकारण्यामागचं कारण

Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूरने अल्पावधीत सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. ‘आशिकी २’ पासून तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिचा हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
अलीकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘स्त्री 2’ चित्रपट देखील सुपरहिट ठरला. आज बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. मात्र तिला हॉलिवूडमध्ये ऑफर मिळाल्या होत्या. परंतु तिने त्यास नकार दिला असल्याचा खुलासा एका कार्यक्रमात केला आहे.
एका कार्यक्रमात हॉलिवूडमध्ये काम करण्यासंदर्भातील प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “मला काही हॉलिवूड ऑफर्स आल्या होत्या. पण त्या मला फारशा आवडल्या नाहीत. माझ्यासाठी एखादी भूमिका किंवा कथा उत्साहपूर्ण असली पाहिजे, तेव्हाच मी ती स्वीकारते. सध्या भारतीय सिनेमाचा जो काळ सुरु आहे तो खूप एक्सायटिंग आहे. इतके ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता आले आहेत. खूप विस्तार होत आहे. मला खरंच असं वाटतं की मला शाहरुख खानसारखं बनायचं आहे. आपल्या सिनेमांचं मार्केट तिकडे घेऊन जायचं आहे. आपले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे अशी माझी इच्छा आहे.”
‘स्त्री २’ च्या यशावर श्रद्धा म्हणाली, “माझा आधीपासूनच विश्वास होता की ‘स्त्री २’ ब्लॉकबस्टर ठरेल. म्हणून मी त्या दरम्यान कोणताही दुसरा प्रोजेक्ट साईन केला नाही. मला या सिनेमावर पूर्ण विश्वास होता.” नुकतंच श्रद्धाने सौदीमध्ये झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी तिची भेट ‘स्पायडरमॅन’ फेम अँड्र्यू गार्फिल्डसोबत झाली होती.
दरम्यानम श्रद्धाच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाने जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने जगभरात 857 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रसिद्धीही वाढली असून तिला अनेक चित्रपटांसाठी ऑफरही मिळत आहे.





