पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. खून, खंडणी, दहशत माजवणे, शहरात कोयता घेऊन फिरणे यासह चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता तर चोरटयांनी थेट शरद पवारांच्या नातीच्या शोरूमवर डल्ला मारला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या कल्याणीनगरमधील शोरूमचं लॉक तोडून रोख रक्कमेसह दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
काय आहे नेमके प्रकरण?
निवेदिता साबू या शरद पवारांच्या नात आहेत, त्यांचं कल्याणीनगर भागात कपड्यांचं शोरूम आहे. त्यांच्या या शोरूममधून चोरट्यांनी 7 ऑगस्ट रोजी 9 लाख 99 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी रांजणगावमधून चोरट्यांना अटक केली.
विवेक उर्फ गुरुदेव मनिराम राजपूत (वय 30, सध्या रा. रांजणगाव, मुळ रा. मैनपुर, उत्तर प्रदेश), अभिषेकसिंग उर्फ प्रदिप पप्पुसिंग (वय 25, कानपुर, उत्तर प्रदेश), अमितसिंग विजयसिंग (वय 31, बांधा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशमधील असून कामानिमित्त ते रांजणगाव येथे राहणारे होते.