Pune : काम दाखवा, नाहीतर उचलबांगडी

पुणे : पोलिसांना वाहने दिली, आॉफिस दिले, पायाभूत सुविधा दिल्या तसेच पोलीस प्रशासनाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप केला नाही. पोलिसांना मुभा दिली. तरी, शहरात कायदा सुव्यवस्थेचे प्र्श्न निर्माण होत आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कमी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे जमत नसेल तर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगावे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच पोलीस आयुक्त यांना काम दाखवा, नाहीतर दुसऱ्या व्यक्तीला आणावे लागेल, असे सांगत पवार यांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांना बदलीचा थेट इशारा देत काम सुधारण्याचा सल्ला दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पुणे शहरात कोयता गॅग, खून आणि चोरीच्या घटना वाढत असल्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी गांभीर्याने घेतली आहे. पोलीस आयुक्त यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्यांनी सांगावे दुसरे चांगले अधिकारी आणून येथील स्थितीत बदल करावा लागेल. गुन्हेगारीला चाप बसला पाहिजे, पोलिसांचे असे काम पाहिजे.
सोमवारी या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत पवार म्हणाले की, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवत पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे तसेच समाजात शांततापूर्ण वातावरण राहील, ही जबाबदारी आमची आहे.
पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात जाब विचाणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलीस आयुक्तांना मुदत देणार असून या मुदतीत काम दाखवा नाहीतर दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या जागी आणावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी पोलीस आयुक्तांना काम सुधारण्याचे आदेश दिले.





