शिरूर : शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने अनेकांना गुन्हा नोंदवण्यासाठी शिरूरला धाव घ्यावी लागत आहे. परिणामी “औटपोस्टवर अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा!” अशी उपरोधिक चर्चा गावागावांत रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांत चोऱ्या, घरगुती वाद, हाणामाऱ्या या घटना वाढल्या असून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्याचे प्रमाणही वाढत आहे. यामागे राजकीय हस्तक्षेपाची छाया असल्याच्या चर्चा असून खऱ्या दोषीची ओळखच धूसर होते आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त नागरिकांना न्यायासाठी याचना कराव्या लागत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस वाहन बिघडल्याने रात्र गस्त ठप्प झाली आहे. किरकोळ दुरुस्ती करायची कोणी यासाठी अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे. मात्र कोणीच पुढाकार घेत नसल्याने रात्र गस्त ठप्प झाली असून पोलिसिंग शिल्लक नसल्याने गुन्हेगारांसाठी मोकळे मैदान तयार झाले आहे. अवैध व्यवसायांचा गोरखधंदा बेधडक सुरू आहे. “हे पोलिसांना दिसत नाही का? की हेतुपुरस्सर दुर्लक्ष?” त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली असून बेट भागातील नागरिकांचे पोलीस प्रशासनावरचे समाधान आता पूर्णपणे ढासळले असून तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आता टाकळी हाजी औटपोस्टला दबंग व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देतील का? की ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशीच स्थिती कायम राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.