satara | महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा

लिंब (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वार्थी लोक एकत्र आले आहे. सत्तेचा स्वार्थ फार काळ एकत्र राहू देत नाही. अशा स्वार्थाने एकत्र आलेल्या महाभकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत तुम्ही जागा दाखवा, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले
लिंब तालुका सातारा येथे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, माजी सभापती सुनील काटकर, सर्जेराव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, माजी उपसभापती दादा शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, धर्मराज घोरपडे, तात्यासाहेब वाघमळे, अरुण कापसे, रमेश चव्हाण, राजेंद्र लवंगारे, संदीप शिंदे , हनुमंत चवरे आदींची उपस्थिती होती
उदयनराजे म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने मोदींच्या प्रगतीच्या मार्गा विरोधात जाऊन एकत्र येण्याचे काम केले आहे. त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा असून नेतृत्वच नाही. त्यामुळे त्यांचा मार्ग अधोगतीचा आहे. तर भाजपचा मार्ग हा प्रगतीचा राजमार्ग आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे मते मागण्याची नैतिकताच राहिलेली नाही असा घणाघात उदयनराजे यांनी केला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सहकारी साखर कारखान्यांना काँग्रेस सरकारने जुलमी पद्धतीने आयकर लावला होता. महाराष्ट्रातील सर्व सहकारी कारखान्यांकडे नोटीसा पाठवून रुपयांचे आयकर मागणी सरकारने केली होती. हा आयकर माफ करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती.
अवघ्या दोन बैठकांमध्ये भाजपच्या या नेत्यांनी आयकर माफीचा निर्णय जाहीर केला. साखरेला 3100 चा हमीभाव देखील दिला, त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी टिकली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. जे निर्णय काँग्रेसच्या राजवटीत व्हायला पाहिजे होते ते भाजपच्या काळात झाले. सगळे वाद मिटवून आपण भाजपचे सरकार केंद्र आणण्यासाठी एकत्र येऊया.





